मुंबई : मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणा-या हभप अजय बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बारस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत जरांगे हे हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांचे नुकसान केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना बारस्कर हे सरकारचे प्याद असल्याचे सांगत हा महाराज नसून भोंदू बाबा असल्याचे म्हटले होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू याचा आदेश आहे की, पक्षातील कोणीही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षणकिंवा नेत्यांबद्दल कोणीतीही भूमिका मांडू नये असे केल्यास त्यांचा पक्षाशी कुठलाही संबंध राहणार नाही. कुठल्याही विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका अध्यक्ष बच्चू कडू हे स्वत: मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेंबाबत जी भूमिका मांडली त्याच्याशी प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही. पण बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबंध राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.