32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयआयेगा आनेवाला...!

आयेगा आनेवाला…!

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता येईल ते सध्या तरी गुलदस्त्यात आहे. परंतु जो तो आमचीच सत्ता येणार असे सांगत आपले घोडे दामटत आहे. ‘अब की बार चार सौ पार’ असा काही जणांचा दावा आहे तर ‘अब की बार हद्दपार’ असा इशारा काही जण देत आहेत. सत्तासोपानाचा हा खेळ सध्या तरी विलक्षण रंगतो आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप भरघोस मतांनी केंद्रात सत्ता स्थापन करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनातील समारोपाच्या भाषणात व्यक्त केला. पंतप्रधान पुढे म्हणाले, मला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये परदेश दौ-याची आमंत्रणे आली आहेत. म्हणजे विदेशी लोकांनाही माहीत आहे की, आयेगा तो मोदीही! पंतप्रधानांची ही तर्कसंगती विचित्रच वाटते, तिला ‘अहं’पणाचा वास आहे, कदाचित ती धोकादायक अन् धक्कादायक असू शकते. कारण निवडणुकीच्या उदरात काय दडलंय ते कोणीही सांगू शकत नाही.

आयेगा तो मोदीही! असे सतत मोदी जनतेच्या मनावर का बिंबवत आहेत? आगामी लोकसभा निवडणूक जिंकून मोदींनी पंतप्रधानपदावर बसण्याची इच्छा बाळगण्यात काहीच गैर नाही, पण मोदींच्या एकंदरीत वक्तव्यातून त्यांच्या नसानसात अहंकारच भरलेला दिसून येतो. त्यांनी इतका अहंकार बाळगणे योग्य नाही, कारण गर्वाचे घर क्षणार्धात खाली होण्यास वेळ लागत नाही. राजा कधीही प्रजेच्या हितासाठी मी अमूक केले, तमूक केले असे सांगत नाही परंतु मोदी सतत आपल्या कामाचे जनतेसमोर तुणतुणे वाजवत असतात. आम्ही इतक्या लाख लोकांना मोफत धान्य वाटप करत आहोत, इतक्या लाख लोकांना घरे देणार आहोत, शेतक-यांच्या खात्यात इतके पैसे जमा करणार आहोत असे घसा फोडून सांगितले जाते पण यासाठी लागणारे पैसे येतात कोठून? याचा हिशेब सरकारने जनतेला द्यायला हवा. आम्ही चारशेहून अधिक जागा जिंकू असा विश्वास मोदी व्यक्त करतात तो कशाच्या जोरावर? इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनच्या जोरावर? कारण त्यात घोटाळा होऊ शकतो असे विरोधकांचे म्हणणे आहे. सध्या भाजपने तोडा-फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केलेला दिसतो. सत्ताधारी पक्षाने आपल्या पक्षात अनेक भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांना, नेत्यांना सामील करून घेऊन त्यांना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ केले आहे.

त्यामुळे राजकारणाची बजबजपुरी झाल्याचेच दिसते. भाजपला दोन वेळा जनतेने बहुमत दिले. आता पुन्हा तिस-यांदा सत्ता मिळावी यासाठी भाजप नेत्यांचा व मोदींचा जिवाचा आटापिटा चालला आहे. काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड करणार या आश्वासनावर जनतेने पहिल्यांदा भाजपला सत्ता दिली होती. त्यानंतर ‘अच्छे दिन’ आणण्याच्या वल्गनेवर विश्वास ठेवून दुस-यांदा सत्ता दिली होती. परंतु आपली घोर फसवणूक झाल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. आता ‘अच्छे दिन’चे कवित्वही संपले आहे. मोदींनी सत्तेच्या जोरावर काय काय मनमानी केली ते जनतेला कळून चुकले आहे. मी भोगासाठी नव्हे तर देशहितासाठी तिस-यांदा सत्ता मागत आहे असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. विरोधक मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने देत आहेत. पण त्यांच्याकडे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. भारतीय जनता पक्षातच विकसित भारत घडविण्याची पात्रता आहे असे मोदींनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनाच तिस-यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार जनतेने केल्याचा साक्षात्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झाला आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच देशाचे हित साधण्यास सक्षम आहे असे त्यांना वाटते. विरोधी इंडिया आघाडी म्हणजे घराणेशाही पोसणा-या सात राजकीय पक्षांचा गट आहे. त्यांचा भर भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणावर असल्याची टीकाही त्यांनी केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवले तेव्हा वाटले होते की, देशात चांगले बदल होतील, राजकारणाचा दर्जा सुधारेल, राजकीय नेत्यांच्या वर्तणुकीत, चारित्र्यात सकारात्मक बदल होतील. सबका साथ-सबका विकास असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जनतेत आशा निर्माण केली, मात्र गत दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि भाजप व नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये जमीन-अस्मानचे अंतर दिसून आले. सबका साथ असे म्हणत मोदी देशाच्या आजवरच्या वाटचालीत मोठे योगदान दिलेल्या काँग्रेसला, काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत ते कसे भ्रष्टाचारी आहेत, देशद्रोही आहेत याचा डंका पिटू लागले. नंतर भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला,

त्याचबरोबर ‘शतप्रतिशत भाजप’चा नाराही दिला. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची कार्यपद्धती भाजपने अवलंबली. त्यातून काँगे्रस वा इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोप सुरू झाले. आपल्या इशा-यानुसार वागणा-या यंत्रणांना कामाला लावायचे आणि त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्याकडील वॉशिंग मशिनमध्ये टाकून पवित्र करून घ्यायचे तंत्र भाजपने अवलंबले. हे करताना वर्षानुवर्षे जपलेल्या विचारधारेला तिलांजली देत भाजपने मेगाभरती सुरू केली. भाजप हा विचारधारा तत्त्व मानणारा पक्ष मानला जायचा, सत्तेसाठी भाजप तडजोड करणारा नव्हता. आजचे चित्र वेगळेच दिसते आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग, गुलाम नबी आझाद, विजय बहुगुणा, एस. एम. कृष्णा, किरणकुमार रेड्डी, गिरधर गमांग, बोम्मई, हिमंता बिस्वा सरमा, राधाकृष्ण विखे पाटील, रणजित निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह, नारायण राणे, अशोक चव्हाण हे नेते भाजपच्या वळचणीला कसे काय गेले? आज भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्यभर झटणारे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी अशी स्थिती आहे. पलटुराम संस्कृती जनतेला रुचणारी नाही हे भाजपने लक्षात घ्यायला हवे. ‘आयेगा आनेवाला…’ येणारच आहे पण ‘आयेगा तो मोदीही’ ही वृत्ती-प्रवृत्ती घातक ठरणार आहे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR