पुणे : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रॅकेटमधला मास्टर माईंड हा मूळचा पंजाबचा असून, सध्या तो कुटुंबासह इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आता दिल्ली येथे सापडलेले ९७० किलो ड्रग्ज परदेशात पाठवण्याची तयारी करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुरकुंभ येथील कंपनीत तीन महिन्यांत २ हजार किलो ड्रग्जनिर्मिती करण्याचे आदेश या मास्टर माईंडने दिले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जनिर्मिती या कंपनीमध्ये सुरू होती.
आतापर्यंत पुणे पोलिसांनी १७०० किलो ड्रग्ज जप्त केले आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून कुख्यात गुंड वैभव माने याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडे ५०० ग्रॅम ड्रग्ज सापडले. चौकशीदरम्यान त्याने हैदर शेख याची माहिती दिली. त्यानंतर तपासाची चक्रे जोरदार फिरवत फोन बंद करून बसलेल्या हैदर शेख याला पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी येथून पकडले.
हे दोघे सापडल्यानंतर एका गोदामात ५५ किलो ड्रग्ज पकडण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडे चौकशी केली आणि मध्यरात्री पुणे पोलिसांची पथके कुरकुंभ एमआयडीसीत पोहोचली. येथे उत्पादन होत असलेल्या अर्थ फार्मा लॅब (अर्थ केमिकल कंपनी) येथे छापे मारले. तेथून तब्बल ५५० किलो एमडी जप्त केले. कंपनी मालक भीमाजी ऊर्फ अनिल साबळे (वय ४५) व केमिकल इंजिनीअर युवराज भुजबळ (वय ४०) यांना ताब्यात घेतले आहे. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कारवाई केल्यानंतर पोलिसांनी १८ पथके तयार केली. या पथकांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये छापे टाकले. आतापर्यंतच्या तपासात हे मोठे इंटरनॅशनल रॅकेट असून, याचा मास्टर माईंड पंजाब येथील असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतून परदेशात पाठविण्याचा होता प्लॅन
पुण्यातील या ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे वास्तव समोर आले आहे. पुण्यातून ड्रग्ज दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, मीरा भाईंदर अशा शहरांमध्ये विकण्यासाठी पाठवलं जात होतं. दिल्लीत साडेनऊशे किलो ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. दिल्लीत करण्यात आलेला ड्रग्जचा साठा परदेशात पाठवला जाणार होता, अशी सूत्रांची माहिती आहे.