मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिले असून शरद पवार आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. आता चिन्हही बहाल केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही निवडणूक आयोगाच्या चिन्हाची री ओढत अजित पवार गटालाच पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले. दरम्यान, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. त्यावेळी अजित पवार गटाने शरद पवार यांना दिलेल्या पक्षाचे नाव रद्द करावे आणि पक्षचिन्हही देऊ नये, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत शरद पवार गटाकडे नवीन पक्षाचे नाव कायम ठेवत निवडणूक आयोगाने ८ दिवसांत चिन्ह द्यावे, असा आदेश दिला. त्यानुसार शरद पवार गटाने केलेल्या मागणीनुसार त्यांना तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळाले. खरे तर शरद पवार गटाने वटवृक्षाच्या चिन्हाची मागणी केली होती. त्याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाचे शरद पवार गटाने स्वागत केले आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ््या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारसाठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.