नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशनंतर काँग्रेसने ‘आप’शी दिल्ली, गुजरात आणि हरियाना राज्यांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पंजाबमध्ये मात्र या दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे आता स्पष्ट झाले. दिल्लीत आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आप-कॉंग्रेसची आघाडी महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे इंडिया आघाडीला बळ मिळण्यास मदत होणार आहे.
आप व काँग्रेसमध्ये सुरू असलेली आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यानुसार दिल्लीत ‘आप’ चार जागांवर तर काँग्रेसचे उमेदवारी तीन लोकसभा मतदारसंघात ंिरगणात राहणार आहेत. यापूर्वी ‘आप’च्या वाट्याला नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली व उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ तर काँग्रेसच्या वाट्याला पूर्व दिल्ली, चांदणी चौक व उत्तर दिल्ली मतदारसंघ येणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय ‘आप’ला गुजरातमध्ये दोन मतदारसंघ मिळणार आहेत. यात भरूच, भावनगर, सुरत या तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात आपचे उमेदवार राहणार आहेत. उर्वरित मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रिंगणात राहतील. याशिवाय हरियाणा राज्यातही काँग्रेससोबत आपची आघाडी राहणार आहे. हरियाणातील दहा लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ ‘आप’ला सोडण्यात येणार आहे.
फरिदाबाद किंवा गुरुग्राम या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील दोनपैकी एकही मतदारसंघ आपकडे राहणार नाही. ‘आप’ने दक्षिण गोवा मतदारसंघ काँग्रेसकडे मागितला होता. पंजाबमध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
इंडिया आघाडीला बळ
आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिल्लीसह इतर राज्यातील जागावाटपावर तोडगा काढला आहे. यामध्ये हरियाणा, गुजरात, गोव्याचा समावेश आहे. आधी समाजवादी पक्ष आणि आता आपसोबत आघाडी झाल्याने इंडिया आघाडीला बळ मिळणार आहे. पंजाबमध्ये मात्र मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू आहे.