25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रछोटे पक्ष संपवा हेच भाजपचे धोरण

छोटे पक्ष संपवा हेच भाजपचे धोरण

मुंबई : ‘आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि छोटे पक्ष संपवा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केले होते. या आवाहनावर आता काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपाचे हेच धोरण पूर्वीपासून राहिले आहे. मैत्री करा, त्यानंतर पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा. हे खून करण्याचे धोरण भाजपाचे पूर्वीपासूनचे राहिले आहे. मला वाटतं, बावनकुळे जे बोलले ते खरं बोलले आहेत. ते खोटे बोलणारे नेते नाहीत. त्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडले आहे.

दरम्यान, नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले. ‘‘विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथप्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान ५० पदाधिका-यांना आपल्या पक्षात घ्यावे आणि छोटे पक्ष संपवावे. मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करू शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिका-यांनी करावा’’, असे विधान बावनकुळे यांनी केले.

अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा नाही
उद्यापासून (दि. २६ फेब्रुवारी) विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पाबाबत पाच दिवसांचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याचेही विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. पाच दिवसांत एक सत्ताधा-यांचा आणि एक विरोधकांचा प्रस्ताव असेल. चार दिवस अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होईल. पण राज्यात महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न घ्यायला हवे होते. किमान लक्षवेधींवर चर्चा करावी, अशी आमची आग्रही मागणी होती. पुढे निवडणुकांमुळे पाच महिने अधिवेशन होऊ शकणार नाही, अशावेळी जनतेला त्यांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. पण सामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकारने केले.

मोदी-शहांची विचारसरणी : संजय राऊत
या देशातून लोकशाही संपविण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. हुकूमशाहीविरोधात जे लहान-मोठे पक्ष उभे राहत आहेत, त्या लहान पक्षांना संपवायचे, मोठ्या पक्षांना फोडायचे, ही बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची भूमिका देशाला घातक आहे. बावनकुळे जे बोलले ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय भूमिका आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्या भाजपची ही भूमिका नाही. ही मोदी-शहा यांची विचारसरणी आहे, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR