22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रसलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न

सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न

मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी ‘सागर’ बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारून दाखवावे, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
ब्राह्मणी कावा मला फडणवीस दाखवत आहेत. पण, फडणवीस काय चिज आहे हे मला माहिती आहे. अनेक नेते आज भाजपमध्ये का येत आहेत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण, फडणवीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.

भाजपला मोठे करणा-या मुंडे बहिणींची काय अवस्था करण्यात आली आहे. त्यांची घुसमट सुरू आहे. धनंजय मुंडे सध्या गपगार बसले आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे मी सलाईन देखील घेणे सोडून दिले आहे. फडणवीस यांच्या मनात असतं तर लगेच सगेसोय-याचा निर्णय झाला असता, असे जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांसोबत दोन-तीन मराठ्यांचे आमदार आहेत. शिंदेंचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. पण, मी पण शेतक-याचा, मराठ्याचा मुलगा आहे. मी फडणवीसांना पुरून उरेन. देवेंद्र फडणवीसांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य तेच चालवत आहेत. फडणवीसांना कुणी पुढे गेलेले आवडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला लावले जात आहे. ५ महिने झाले फडणवीस गुन्हे मागे घ्यायला तयार नाहीत. मी माझ्या समाजासाठी काम केले तर काय चूक केली. माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या. मी लगेच सागर बंगल्यावर येतो. त्यांना माझा बळी हवा आहे. मला काही झाले तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका. मराठ्यांत आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, अशी घणाघाती टीका जरांगेंनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR