25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याजरांगेंना भांबेरी गावात रोखले

जरांगेंना भांबेरी गावात रोखले

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आज प्रचंड आक्रमक झाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मी फडणवीसांच्या सांगर बंगल्यासमोर जाणार असून, तेथे माझा जीव घ्यावा, असे म्हणत ते थेट अंतरवालीतील व्यासपीठावरून उतरले आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गावक-यांनी अडवले. परंतु ऐकले नाही. त्यानंतर त्यांना भांबेरी (ता. अंबड) गावात महिला आणि कार्यकर्त्यांनी रोखले. परंतु ते मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. दरम्यान, या पाठीमागे मोठी शक्ती असून, त्याचा शोध सरकार घेईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घ्यायचा असेल तर मी स्वत:च फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो, असे म्हटले. माझ्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या, असे खुले आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. हे षडयंत्र फडणवीसांचे असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही यामध्ये सामील असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आम्ही न्यायालयाचा सन्मान केला. सलाईन घेतले. शांततेत रास्ता रोको केला. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल केले. आमच्याविरोधात यांनी षड्यंत्र रचले. सगेसोय-यांची अंमलबजावणी मुद्दाम करत नाहीत, असेही जरांगे यांनी नमूद केले. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गावात अनेकांनी अडविले. परंतु जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून, ते रवानाही झाले. परंतु पुढे भांबेरी गावात त्यांना अडविले. त्यावेळी तेथेही त्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केला.

अजित पवार कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. पण जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरें असे म्हणत ते तिकडे गेले. छगन भुजबळ देखील शरद पवारांना कधी सोडू शकत नाहीत. पण देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील म्हणून अजित पवारांसोबत पटत नसून छगन भुजबळांना भाजपसोबत जावे लागले. एकनाथ शिंदे देखील कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. पण नाईलाजाने त्यांना माघारी जावे लागले तर अशोक चव्हाणांच्या घरी ३ वेळा मुख्यमंत्री पद दिले. ते देखील कधीच काँग्रेस सोडू शकत नाहीत. मात्र, त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावे लागले. या पाठीमागे फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला.

कायदा व सुव्यवस्था बिघडविल्यास माफी नाही
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य सरकारने रोखठोख भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहेत. गृह विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. कोणी जर परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

कायदा सुव्यस्था राखण्याचा जबाबादारी आमची आहे. सरकारने केलेल्या कामाची जाणीव आंदोलनकर्त्यांनी ठेवली पाहिजे. कोर्टाने दाखवलेल्या त्रुटी आम्ही दूर केल्या. आरक्षण कोर्टात टिकेल ही जबाबदारी आमची आहे. सगेसोय-यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. जो शब्द आम्ही दिला तो पाळला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेऊन लढ्यात उतरले होते. पण त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. त्यांची आताची भाषा राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणी तरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच काहीही बोलले तरी खपते, असे कुणी समजू नये, असे उपमुख्यमत्री अजित पवार म्हणाले, तर जरांगेंच्या तोंडी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भाषा असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणे ही आपली संस्कृती नाही. हे मनोज जरांगे पाटील यांना कोणी बोलायला लावत आहे का? हे पाहावे लागेल. आता आरक्षण दिल्यानंतर विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हते की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे ते टीका करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केले नाही ते सांगा. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला जागा दाखवेल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR