नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे खात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असेच म्हणावे लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. यात २ हजारांहून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी एकट्या रेल्वे खात्यासाठी घेऊन आले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. हे सगळे प्रकल्प देशाला समर्पित करत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी १२.३० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ४१ हजार कोटी रुपयांच्या सुमारे २ हजार रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीदेखील केली. या निर्णयामुळे देशातील २७ राज्यांमधील ५५३ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेत विविध प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रीही उपस्थित होते. आपण पहिल्यांदाच २ हजार योजना एकाचवेळी सुरू करत आहोत. रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे, असे मोदी म्हणाले.
प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मेदी यांच्या हस्ते करण्यात आली. यासोबतच भारतभर ओव्हरब्रीज आणि अंडरपासचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, भारत आता मोठी स्वप्ने पाहात आहे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कामही करीत आहे. या कामांमुळे लोकांचे जीवन अधिक सुलभ होईल. २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पसरलेल्या या स्थानकांचा १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाईल. ही स्थानके शहराच्या दोन्ही बाजूंना एकत्रित करून सिटी सेंटर म्हणून काम करतील.
या स्थानकांमध्ये रुफटॉप प्लाझा, सुंदर लँडस्केप, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, सुधारित आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याची जागा, किओस्क, फूड कोर्ट आदी आधुनिक सुविधा असतील. पर्यावरण स्नेही आणि अपंगांसाठी अनुकूल असा पुनर्विकास केला जाईल. स्थानकांच्या इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल, असे सांगण्यात आले.
राज्यातील ५६ रेल्वे स्थानकांचा कायापालट
महाराष्ट्र : ५६ रेल्वे स्थानके
गुजरात : ४६ स्थानके
आंध्र प्रदेश : ४६ स्थानके
तामिळनाडू : ३४ स्थानके
बिहार : ३३ स्थानके
मध्य प्रदेश : ३३ स्थानके
कर्नाटक : ३१ स्थानके
झारखंड : २७ स्थानके
छत्तीसगड : २१ स्थानके
ओदिशा : २१ स्थानके
राजस्थान : २१ स्थानके
१५०० ओव्हरब्रिजचे भूमिपूजन
यासोबतच १५०० ओव्हरब्रिज, अंडरपास यांचेही भूमिपूजन करण्यात आले. उत्तर प्रदेशात २५२, महाराष्ट्रात १७५, मध्य प्रदेशात १३३, गुजरात १२८, तामिळनाडूत ११५, राजस्थानात १०६, छत्तीसगड ९० आणि झारखंडमध्ये ८३ प्रकल्पांचा समावेश आहे.