जालना : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संचारबंदीमुळे मुंबईकडे जाण्याचा निर्णय मागे घेतला आणि अंतरवालीत येऊन उपोषण सुरू केले. मात्र, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन अचानक त्यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. १६ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. आता यापुढे साखळी उपोषण सुरू ठेवत राज्यात गावागावांत जाऊन रान पेटविणार असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे यांनी दिले.
जरांगे यांनी सोमवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित केला जाईल. संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झाले आहेत. पण मी सुखरूप आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर कुणी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले.
आज मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करीत असून, आता गावागावांत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मूलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी मनोज जरांगे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे म्हटले होते. ते मुंबईच्या दिशेने निघालेही होते. परंतु पोलिसांनी त्यांच्या सहका-यांची धरपकड करत संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला आणि ते पुन्हा अंतरवाली सराटीला पोहोचले होते.
३ जिल्ह्यांत इंटरनेट, बससेवा बंद
जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जालन्यासह छत्रपती संभाजीनगर आणि बीडमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. चुकीचे मॅसेज पसरले जाऊ नयेत. यासाठी काळजी घेण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यात तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आल्याने तिन्ही जिल्ह्यांत बससेवाही स्थगित करण्यात आली होती. तसेच बीड-जालना जिल्ह्याची सीमा सील केली होती.
जरांगेंवर प्रथमच गुन्हे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांनी थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. कालपासून जरांगेंसह आंदोलकांवर जवळपास १०४१ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ४२५ गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल केल्याचे समजते.
आंदोलकांची धरपकड
जरांगे पाटील यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली असून, पोलिसांनी जरांगे यांच्या सहका-यांची धरपकड सुरू केली आहे. रविवारी रात्री जरांगे यांच्या ५ लोकांना ताब्यात घेतले. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून पोलिस आंदोलकांचा शोध घेत आहेत.