छ. संभाजीनगर : सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २-३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे बळिराजा चांगलाच संकटात सापडला आहे. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची देखील भंबेरी उडाली आहे. या पावसामुळे राज्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात सगळ्यात जास्त नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबादमध्ये झालेल्या वादळी वा-यासह गारांच्या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले आहे. गारपीट झाल्याने हरभरा, गहू, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जालन्यात झालेल्या रात्रीच्या पावसाने गहू, ज्वारी हरभ-यासह फळबागांना मोठा फटका बसला आहे. तर जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, नळहिवरा, काळेगाव, भातोडी यासह इतर गावांना गारपिटीचा काल रात्री जोरदार तडाखा बसला. या अवकाळीत अर्चना ऊर्फ पल्लवी विशाल दाभाडे (वय २१, रा. कुंभारी, ता. भोकरदन) आणि सिपोरा (ता. भोकरदन) येथील शेतकरी शिवाजी कड (वय ३८) यांच्यावर वीज कोसळून ठार झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात निसर्ग कोपला
बुलडाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपासून मेघगर्जना तसेच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेताच्या नुकसानीसह तापमानात मोठा गारवा निर्माण झाला आहे. चिखली, देऊळगाव राजा रोड बर्फाने झाकला गेला होता.
पक्ष्यांचा मृत्यू, वीजपुरवठा खंडीत
बुलडाण्यात झाडावरील पक्ष्यांना गारपिटीचा फटका बसल्याने शेकडो बगळे झाडावरून खाली कोसळले. त्यात ब-याच बगळ्यांचा मृत्यू झाला तर काही पक्ष्यांनी गावातील घरांचा सहारा घेत जीव वाचविला. जिल्ह्यात वादळी पाऊस असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून जिल्हा अंधारात होता.
मंडप कोसळला, अपघातामुळे महामार्ग ठप्प
संग्रामपूर तालुक्यात वणखेड गावात भागवत कथा सुरू असताना आलेल्या वादळी वा-यामुळे मंडप कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र अनेक वृद्ध भाविक मंडपाखाली दबले गेले होते. वादळी वा-यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेगाव-संग्रामपूर मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
अकोल्यात आंबा पिकाला फटका
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या आडसूळ ते तेल्हारा रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता बंद झाला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यातल्या अनेक भागांत गारांसह पाऊस झाला. रात्री ९ नंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळाला, यामुळे रबी गहू, हरभरा, भाजीपाला पिके आणि आंबा पिकाला फटका बसला आहे.