सोलापूर : सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहनचालक, दोन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत. सचिन कुंभार (वय २५) आणि लक्ष्मी कुंभार (वय २४) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेले दोघे पती-पत्नी अफजलपूर (जिल्हा विजयपूर, कर्नाटक) येथील आहेत.
मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आंधळगावजवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता. पाठीमागून क्रुझर जीपने जोराची धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. क्रुझर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून के. ए. २७ बी ८१८८ असा या गाडीचा नंबर आहे.
मंगळवारी पहाटे झालेला अपघात इतका भीषण होता की क्रुझरच्या समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता. मदतकार्य करणा-यांनी जेसीबी बोलावून क्रुझरला ओढून बाहेर काढले. जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले. दोन लहान बालके आणि ड्रायव्हरला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील १०८ क्रमांक अॅम्ब्युलन्सचे डॉक्टर वैभव जांगळे आणि पायलट सुरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली.