15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeराष्ट्रीयचुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले

चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले

पाटणा : देशभरात विविध मुद्यांवरून राजकारण तापले असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या एका विधानानंतर गदारोळ सुरू झाला असून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, यातच बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मातोश्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांची बाजू घेतली असून चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले, असे म्हटले आहे.

बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मुले जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल, अशा आशयाचे विधान नितीश कुमार यांनी केले. यावरून नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र, राबडी देवी यांनी बाजू घेतली आहे. राबडी देवी म्हणाल्या, त्यांच्या तोंडून चुकून तसे विधान बाहेर पडले. या विधानाबद्दल त्यांनी सभागृहात माफी मागितली आहे. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे. नितीश कुमार यांनी त्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. ते चुकून तसे बोलून गेले, असे राबडी देवी यांनी सांगितले. तत्पूर्वी, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचा बचाव केला आहे. वाद वाढत असताना मुख्यमंर्त्यांच्या विधानाकडे दुस-या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही, असे सांगून ते केवळ लैंगिक शिक्षणाबाबत बोलत होते, जे शाळांमध्येही शिकवले जाते, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

मी केवळ महिलांच्या शिक्षणासंदर्भात बोललो
यासंदर्भात आता नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मी तर केवळ महिलांच्या शिक्षणासंदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो, अशी नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR