वाकड : येथील पिंक सिटी सोसायटीसमोरील घरासमोर खेळणा-या सलेमान राधेश्याम बरडे या साडेआठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणा-या संशयित आरोपीला वाकड पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. त्याच्यावर अपहरण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पवन जोगेश्वरप्रसाद पांडे (वय २८, रा. नागर, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मृत बालकाचे वडील राधेश्याम रायसिंग बरडे (वय ३३, रा. रोहित कलाटे चाळ, पिंक सिटी सोसायटीसमोर, वाकड) यांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली होती. शनिवारी सायंकाळी सलेमानचे अपहरण झाले होते तर रविवारी दुपारी बावधन येथील टेकडीवर त्याचा मृतदेह आढळला होता.
हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वाकडचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाच्या दोन टीम तयार करून, सलेमानचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्याच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सलेमानला पांडे घेऊन जात असल्याचे दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून केला व मृतदेह बावधन येथे टाकल्याचे त्याने सांगितले.
बरडे बांधकाम मजूर आहेत. त्यांना चार मुले असून, सलेमान लहान होता. बरडे कुटुंबीय राहत असलेल्या चाळीशेजारीच असलेल्या गु-हाळात आरोपी कामाला होता. तिथेच सलेमान खेळत असल्याने दोघांची ओळख होती. यातून आरोपीने एक-दोनदा त्याला उसाचा रस देऊन ओळख वाढवली. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन केला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळल्या आहेत. मात्र, पवनने खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.