पुणे : प्रतिनिधी
– ‘मराठी अभिजात करायची की आधुनिक करायची, यापेक्षा मराठी ज्ञानभाषा होणे अगत्याचे आहे. काळानुरूप आपल्याला पुढे जायचे की मागे, हे नेमके ठरवण्याची वेळ आली आहे. अभिजात दर्जा, ज्ञानभाषा हे त्याविना केवळ बुडबुडे आहेत. बदलत जाणा-या भाषेत, संगणकीकरणाच्या प्रक्रियेत अधिकाधिक मराठीत लेखन होणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, समीक्षक व लेखक डॉ. मिलिंद मालशे यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘म. सा. पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकातील विसाव्या शतकातील निवडक लेखांचे संकलन असलेल्या ‘अक्षरधन : निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या १००० पृष्ठांच्या बृहद् ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ. मालशे यांच्या हस्ते झाले. ग्रंथाच्या संपादक डॉ. नीलिमा गुंडी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथासाठी अर्थसाहाय्य करणा-या प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित होते.
डॉ. मालशे यांनी मराठी भाषेची सद्यस्थिती, शासकीय पातळीवरील भाषा कारभारावर भाष्य केले. ‘लिप्यंतर म्हणजेच भाषांतर, असा सरकारचा समज झाला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये अशी पुस्तके आहेत. महाराष्ट्रात पण वेगळी परिस्थिती नाही. भाषेच्या संदर्भात अडाणी कारभार आहे, असे ते म्हणाले.’
ग्रंथाच्या संपादक डॉ. गुंडी म्हणाल्या, ‘अक्षरधन’ मधून वाङ्मयीन निष्ठेने प्रबोधनपर्व पेलून धरणारा सामूहिक स्वर ऐकू येतो. यातील लेखांमध्ये भाषा आणि वाङ्मयाविषयी अभ्यास, आस्था आणि दूरदृष्टी आढळते.आपल्या साहित्य-परंपरेतील वळणवाटांचे अर्करूप दर्शनही यातून घडते. मसाप पत्रिकेची निर्मिती साहित्यिक बंधुभाव जोपासण्यातून झाली. त्यातून वाङ्मयीन संस्कृतीची पायाभरणी व्हावी, यासाठी ऊर्जा मिळाली.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे वाङ्मयीन नियतकालिक संस्थेच्या सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे. १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यत: साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील लेखन वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. मात्र यातील निवडक लेखांचा खंड आजवर प्रकाशित झाला नसल्याने हे कार्य दुर्लक्षित राहिले होते. ‘अक्षरधन’ मुळे पत्रिकेचे हे योगदान प्रकाशझोतात येत आहे.
मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपाली दातार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथनिर्मितीत योगदान देणा-या प्रदीप अमृता खेतमर, आरती देवगावकर यांचा सत्कार करण्यात आला.