मोडनिंब : बलाढ्य शक्तीविरोधात लढण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी मी नेहमीच पांडुरंगाला जातो, संतांचे आशीर्वाद आणि मतदारांची साथ हीच माझी शक्ती आहे, असे मत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
अरण येथे सोलापूर-पुणे महामार्ग लगत बांधण्यात येणाऱ्या भक्तनिवास इमारतीचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याच ठिकाणी आमदार पवार यांच्या हस्ते भारतातील सर्वात उंच वारकरी ध्वज यापूर्वी उभारण्यात आला आहे. श्री संत सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर आणि आमदार पवार यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. राजेंद्र पवार, सुनंदा पवार, अभिजीत पाटील, अरुण बारसकर, शिवाजी कांबळे, भारत शिंदे, अॅड. विजय शिंदे, सावता रणदिवे,सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संत सावता महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमीआणि संजीवन समाधी असलेली अरण ही भूमि पवित्र आहे. जेव्हा जेव्हा मी अरणला येतो तेव्हा तेव्हा मला प्रेरणा मिळते. संतांच्या विचारामुळेच महाराष्ट्राचा विकास झाला आहे असे आमदार पवार म्हणाले. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्नपुरस्कारासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे ते म्हणाले.
सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. सहा मजली असलेल्या या इमारती मध्ये २४ खोल्याची निर्मिती करण्यात येणार आहे. दोन कीर्तन सभागृह असणार आहेत. तळमजल्यावर मोठ्या सभागृहांमध्ये श्री संत सावता महाराजांचा जीवनपट देखाव्यातून दाखवला जाणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे आणि सावता महाराजांच्या भक्तमंडळांकडून निवासाच्या बांधकामाचा खर्च करण्यात येणार आहे. या भक्तनिवासासाठी स्वतः ची जागा दिली आहे, असे सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांनी सांगितले. भक्तनिवास भूमी पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जत, जामखेडचे हजारो नागरिक यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवसभर संत सावता महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांनी गर्दी केली होती.