सोलापूर : सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून गुंडागर्दी करणे, दहशत माजवणे अशा प्रकारचे तीन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सचिन नागनाथ माने (वय २५, साईनगर, होटगी रोड, सोलापूर) या सराईत गुन्हेगारास दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी बजावले.
आगामी काळात विविध जातीधर्माचे सण-उत्सव, मिरवणुका, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहर-परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस यंत्रणेकडून हे पाऊल उलचण्यात आल्याने सांगण्यात आले. तडीपारीचा आदेश बजावलेला सचिन माने हा विजापूर नाका व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना दहशत माजवून शिवीगाळ करून दमदाटी व मारहाण करून या परिसरातील लोकांना इजा पोहोचवत असे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या कृत्याची दखल घेत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ५६ (१) (अ)(ब) प्रमाणे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांचे आदेश पारित झाले होते. त्याला २५ फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यातून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस उपायुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी पवार, दुय्यम पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे, फौजदार मुकेश गायकवाड, पोलिस रमेश कोर्सेगाव यांनी केली.