बुलडाणा : विदर्भात झालेला गारांचा पाऊस प्रचंड प्रमाणात होता. यामुळे १५ तासांनंतरही गारांचा खच अद्याप शेतशिवारात कायम आहे. शेतशिवारातील या गारा अद्याप विरघळल्या नाहीत. यामुळे शेतक-यांना त्या उचलून पिकांमधून दुस-या ठिकाणी न्याव्या लागत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्याची सीड हब म्हणून ओळख आहे. मात्र वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तालुक्यातील अनेक शेतक-यांचे शेडनेट उन्मळून पडले आहेत. पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे. लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या. १५ तासांनंतरही गारांचा खच अद्याप कायम आहे. शेतांमध्ये साचलेल्या या गारा अद्याप विरघळल्या नाहीत.
शेतातील गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास ४० ते ५० किलोची गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील गहू, हरभरा, मकासह संत्रापिकाचे सुद्धा गारपिटीने नुकसान झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पंचनामा करण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांना सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.