32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeउद्योगअंबानींची मोठी कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर

अंबानींची मोठी कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर

मुंबई : अनिल अंबानी यांची कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या नवीन मालकाचे नाव समोर आले आहे. हिंदुजा समूहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड ४०,००० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली कंपनी विकत घेणार आहे.

या कर्जबाजारी कंपनीला खरेदी करण्यासाठी हिंदुजा ग्रुप कंपनीने ९,६५० कोटी रुपयांची बोली लावली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रिलायन्स कॅपिटलसाठी ९,६५० कोटी रुपयांच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जच्या योजनेला मंजुरी दिली.

रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे २० वित्तीय सेवा कंपन्या आहेत. ज्यात सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. अनिल अंबानींची ही कंपनी ४० हजार कोटींहून अधिक कर्जात बुडाली आहे. प्रचंड कर्जबाजारी असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य शून्य झाले आहे. याच कारणामुळे रिलायन्स कॅपिटलला शेअर बाजारातून डीलिस्ट करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खराब प्रशासन आणि पेमेंट डिफॉल्टनंतर कंपनीचे बोर्ड बरखास्त केले होते. यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीच्या लिलावासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. आता १०८ वर्षे जुन्या हिंदुजा ग्रुपने ही कंपनी विकत घेतली आहे.

‘एनसीएलटी’ने जूनमध्ये दिला निर्णय
‘एनसीएलटी’च्या मुंबई खंडपीठाने ‘आयआयएचएल’च्या योजनेला जून २०२३ मध्ये रिलायन्स कॅपिटलसाठी बोलीच्या दुस-या फेरीत मंजुरी दिली होती. हिंदुजा ग्रुप कंपनीची गेल्या वर्षी जूनमध्ये ९,६६१ कोटी रुपयांच्या आगाऊ रोख बोलीसाठी देखरेख समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR