नागपूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हीडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. बिल गेट्स यांनी बुधवारी आपल्या इन्स्टाग्रामवरून नागपूरमधील एका चहावाल्याच्या टपरीवरील व्हीडीओ शेअर केला आहे. नागपूरमध्ये हा चहावाला ‘डॉली चायवाला’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा व्हीडीओ शेअर करत बिल गेट्स यांनी भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसून येतो, असे म्हणत भारतीयांमधील वेगळेपण शोधण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
अब्जाधीश असलेले बिल गेट्स सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. बिल गेट्स यांनी ‘डॉली चायवाला’च्या टपरीवर कटिंग चहाचा आनंद घेतला. ‘एक चहा प्लीज’ अशा कॅप्शनसहित आपल्या या टपरीवरील भेटीचा व्हीडीओ गेट्स यांनी शेअर केला आहे.
बिल गेट्स हे निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अगदी फॉर्मल लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या व्हीडीओला हजारोंच्या संख्येने कमेंट्स आणि लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. भारतीयांच्या तर या व्हीडीओवर उड्याच पडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. तर डॉली चायवाला हा गॉगल लावून हिरव्या रंगाच्या शर्ट आणि व्रेस्ट जॅकेटमध्ये दिसत आहे.