छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात एका तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयात प्रवेश करत थेट आयुक्तांची गाडी फोडली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्याच ठिकाणी दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची एकच धावपळ उडाली.
छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तालयातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना बघायला मिळाली. दरम्यान, हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे काही काळ पोलिस आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.
नागराज गायकवाड हे आपल्या शिष्टमंडळासह पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. तर, त्यांच्यासोबत ज्याचा वाद झाला ते व्यक्ती चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी आले होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे थेट हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रकार मिटवला. तर, विद्यापीठातील जुन्या वादावरून हा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे.