पुणे, प्रतिनिधी – राज्याच्या नऊ विभागांच्या मंडळाच्या माध्यमातून उद्यापासून (१ मार्च) सुरू होणा-या दहावी परीक्षेसाठी राज्य परीक्षा मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी ग्रा धरावी. त्याचप्रमाणे परीक्षेचा निकाल कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेवर जाहीर करण्यात येईल असे राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त शरद गोसावी यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच यावर्षी परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत असे नमूद करून ते म्हणाले, परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्यावर ताण जाणवत असतो. त्याचा परिणाम होऊ नये यासाठी मंडळाच्या वतीने समुपदेशन सुविधा असणार आहे यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील नऊ विभागीय मंडळांत जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ९ विभागीय मंडळांत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत.
परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना काही कारणामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी परीक्षा न देता आल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर दि. २७ ते ३० मार्च या कालावधीत परीक्षा आऊट ऑफ टर्न माध्यमातून देता येणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितली. राज्यातून परीक्षेसाठी ९ विभागांतून एकूण १६ लाख ०९ हजार ४४५ विद्यार्थी बसणार आहेत. राज्यातील २३,२७२ माध्यमिक शाळेतील विद्यार्थी असून ५०८६ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.