बुलडाणा : बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले बुलडाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले आहेत. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपली शेतजमीन हडपून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्याप्रकरणी गायकवाड तसेच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २०२१ मध्ये त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. तसेच त्या शेतावर अवैधरीत्या फार्महाऊसही बांधले, असा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. आम्ही जेव्हा त्यावर आक्षेप घेतला, तेव्हा मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
तसेच ही शेतजमीन कवडीमोल भावाला विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. तसे न केल्यास आपल्याला जीवे मारण्यात येईल अशी धमकी गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप महिलेने याचिकेत केला होता.
त्यानंतर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गायकवाड व इतर चौघांविरोधात १५६( ३) नुसार १४३, १५०, ३७९, ३८५, ४४७ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.