पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे विश्वासू मानल्या जाणा-या मालेगाव बुद्रुक येथील रणजित तावरे यांना संधी मिळाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगावच्या बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे यांची बिनविरोध पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. बारामती तालुक्यातील अ वर्गातून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते.
अजितदादांच्या जागेवर पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आज बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांच्या सूचनेनुसार रणजित तावरे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांनी सूचक म्हणून तर दत्तामामा भरणे यांनी अनुमोदन दिले. ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे गेले १७ वर्षे अध्यक्ष राहिलेले बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे हे आज बिनविरोध निवडून आले आहेत. रणजित अशोक तावरे हे व्यवसायाने मोठे उद्योजक आहेत. पुण्यात त्यांची १५ टाटाची शोरूम आणि पेट्रोल पम्प आहेत. त्यासोबत छोटे-मोठे व्यवसाय पण आहेत. त्यासोबत गेली ५ वर्ष ते राजहंस दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. बरोबरच प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून दोन वर्षे काम पाहत आले आहेत. रणजित तावरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पवारांचेच वर्चस्व असणार आहे.