नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत देशभरातील १८० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर विचार करण्यात आला. यात काही व्हीआयपी मतदारसंघ तर काही पराभूत झालेल्या संघाचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जवळपास १८० लोकसभा मतदारसंघातील नावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्या नावांची घोषणा एक किंवा दोन मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग त्याशिवाय भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. पहिल्या यादीत व्हीआयपी मतदारसंघ व सातत्याने पराभूत होत असलेल्या काही मतदारसंघांचा समावेश होता. व्हीआयपी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गांधीनगर, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लखनौ तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या १६० मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवरसुद्धा आजच्या बैठकीत चर्चा झाली. १८० संभाव्य उमेदवारांपैकी जवळपास शंभर ते सव्वाशे उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करून विरोधकांना मात देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. भाजपचे उमेदवारी जाहीर करण्याचे सूत्र ठरले आहे. तीन टप्प्यांत उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यांत सर्व व्हीआयपींची उमेदवारी जाहीर केली जाईल. दुस-या टप्प्यात राज्यसभेत चाचपणी केली जाईल. त्यानंतर मागच्या निवडणुकीत दुस-या क्रमांकाची मते ज्यांना मिळाली, त्यांचाही विचार होऊ शकतो.
महाराष्ट्र, बिहारच्या
नावांवर चर्चा नाही-
महाराष्ट्र व बिहार वगळता इतर राज्यांमधील उमेदवारांचीही नावे घोषित होण्याची शक्यता आहे. बिहार आणि महाराष्ट्रात आघाडी असल्याने या दोन्ही राज्यातील घटक पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. आघाडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातच ब-यापैकी हा विषय निपटला जाऊ शकतो.
तब्बल २५ ते ३० टक्के
खासदारांना तिकीट नाही
देशात जे विद्यमान खासदार आहेत, त्यातील ब-याच खासदारांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत त्यावर मंथन करण्यात आले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत २५ ते ३० टक्के विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.