पुणे : मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूब चॅनेल गावरान विश्लेषक यावरील अनोळखी व्यक्तीवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजात, गटात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला. याबाबत विश्वजित दुर्गादास देशपांडे (४१, रा. चंद्रमा रेसिडेन्सी, सनसिटी रोड, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, हा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला.
अधिक माहितीनुसार यूटयूब चॅनेल गावरान विश्लेषक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ब्राह्मण समाज यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना काय गुन्हे दाखल करायचे ते करा असे आव्हान दिले. दोन जातीत, जनमानसात व दोन गटांत मतभेद, वैर, द्वेष भावना वाढवल्या जातील अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.