पुणे : बारामतीमध्ये असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. कारण, व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे हे एकत्र आले होते. त्यामुळे व्यासपीठावरून टीका-टीप्पणी होण्याची शक्यता होती. पण, कोणत्याही टीका-टिप्पणीशिवाय हा कार्यक्रम पार पडला आहे.
दरम्यान, बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये नमो महारोजगाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बारामती शहर राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरेल. बारामतीमध्ये पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आमचे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. विकासाच्या कामात आमचे सरकार राजकारण आणत नाही हे आज स्पष्ट झाले आहे.
राज्यात अशाच प्रकारचे मेळावे घेण्यात येतील. सर्वसमावेशकतेचे राजकारण आपल्याला करायचे आहे. ७५ हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाली आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. बारामतीमध्ये २५ हजार जणांना रोजगार दिला जात आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. नोक-यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बारामतीत झालेल्या नवीन इमारती या दर्जेदार आहेत. पोलिसांच्या नवीन इमारती दर्जेदार आहेत. पोलिस कधीही पाहिलं तर ऊन, वारा, पावसामध्ये बाहेर असतात. आजच्या मंचावर पवार साहेब पण आहेत आणि अजित दादा सुद्धा आहेत. विकास कामात आम्ही राजकारण आणू इच्छित नाहीत. हे पहिले सरकार असेल की सेलिक्शेन झाले की अपॉईंटमेंट द्यायला लगेच तयार आहे, असे शिंदे म्हणाले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळत आहे. सर्वांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळत आहेत. २ कोटी ६० लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. राज्याचं भवितव्य घडवण्याची तरुणांना संधी आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्कील डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आले आहे, असे शिंदे म्हणाले.