बारामती : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, आहेत, बारामतीला नंबर एक करु असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बारामती येथे नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केले तर बारामतीकरांना आश्वासन दिले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बारामतीकरांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या नमो रोजगार मेळाव्यात ब-हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. बारामती विकासाचे मॉडेल आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना त्याचे श्रेय आहे. आमचे सरकार विकासाभिमुख आहे, लोकांचे आहे. याठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. आम्ही चांगल्या कामात राजकारण आणत नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.