सोलापूर –
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार नूतन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी घेतला. त्यांचे स्वागत उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी केले.
पदभार स्वीकारताच शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. मागील दीड वर्षापासून शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवरच सुरू होता. आता शेख यांच्या रूपाने पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने शिक्षणाधिकारी शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वेतन पथकाचे अधीक्षक विठ्ठल ढेपे यांच्यासह मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक काशीनाथ बिराजदार, लेखापाल माहेजबीन शेख, सारंग अंजीरखाने, अमोल गायकवाड, रियाज अत्तार, गुरुप्रसाद तलवार, जाकीर सय्यद, भालचंद्र साखरे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.