29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeसोलापूर१० मार्चनंतर सोलापूरसाठी उजनी धरणातून सुटणार पाणी

१० मार्चनंतर सोलापूरसाठी उजनी धरणातून सुटणार पाणी

सोलापूर : औज व चिंचपूर बंधाऱ्यांची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या औज बंधाऱ्यात १५ मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांना काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जुळे सोलापूर व परिसरास औज व चिंचपूर बंधाऱ्यातून दररोज पाणीपुरवठा केला जातो. औज बंधाऱ्यामध्ये सध्या १०-११ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण ६० टक्क्यांपर्यंतच भरले होते. सध्या उजनी धरण उणे १७ टक्के झाले असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढू लागली आहे. दुसरीकडे हिप्परगा तलावदेखील तळ गाठत आहे. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे. महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, महापालिकेने अगदी काटेकोर नियोजन केले तरीदेखील एप्रिलनंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

औज बंधाऱ्यात १५ मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठ्यात अडथळा होऊ नये, यासाठी १० ते १२ तारखेदरम्यान सोलापूरला पाणी पोचेल, अशा नियोजनाने पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.असे सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर महापालिका अभियंता व्यंकटेश चौबे म्हणाले.

महापालिकेने पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. औज व चिंचपूर बंधाऱ्यांतील पाणी साठ्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून उजीतून पाणी सोडण्याचे निश्चित होईल. १० तारखेनंतर गरजेनुसार सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाईल. त्यावेळी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाईल.
असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR