नागपूर : नागपुरात ४ मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे ‘नमो युवा राष्ट्रीय संमेलन’ होत असून या संमेलनात तब्बल एक लाख तरुण सहभागी होतील असा भाजयुमोचा दावा आहे
. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत हे संमेलन होणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा हा भाजपचा मोठा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या संमेलनात येणा-या तरुणांना गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने केलेली कामे सांगितली जाणारच आहेत. शिवाय पुढील पाच वर्षांत मोदी सरकारकडून विकसित भारत या संकल्पनेसाठी त्यांच्या काय अपेक्षा आहेत, या संदर्भात सूचनाही घेतल्या जाणार आहेत
. या संमेलनाच्या माध्यमातून तरुणांनी दिलेल्या सूचनांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचे भाजपचे नियोजन आहे. नमो युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजयुमोने पूर्ण शक्ती पणाला लावली असून सध्या नागपूर विद्यापीठाच्या पटांगणात संमेलनाची मोठी तयारी सुरू आहे.