पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीच्या जनविश्वास महारॅलीमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नितीश कुमार यांच्यावर हल्लााबोल करताना तेजस्वी यादव यांनी अभिनेता हृतिक रोशनच्या चित्रपटातील इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला अरे फिसल गया ये तूने क्या किया हे गाणे गात खोचक टोला लगावला आहे.
जनविश्वास रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले की, मी जितके लांब पाहतोय तितके लांब मला लोक दिसत आहेत. आम्ही १० दिवस बिहारचा दौरा केला. आपण सर्वांनी यावे ही विनंती केली होती. आज रॅलीतील गर्दीने विक्रम मोडला आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, जेव्हा ते १० लाख नोक-यांबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांनी पैसे कुठून येणार असा सवाल केला होता.
तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे तेजस्वी यांनी लोकांना सांगितले. ते पुढे म्हणाले की राजद हा केवळ माझा पक्ष नाही. काही आमदार इकडून तिकडे फिरतात. पण जनतेला कसे आणि कुठून विकत घेणार? ही विचारसरणीची लढाई आहे. आम्ही सर्वजण कोणालाच घाबरणार नाही. तुम्ही लोकांनी भाजपाला ४० पैकी ३९ जागांवर विजयी केले, त्यांनी नोक-या दिल्या की गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले? पंतप्रधान माझ्या वडिलांबद्दल बोलत होते पण माझ्या वडिलांनी रेल्वेत ऐतिहासिक काम केले. माझ्या वडिलांनी पहिल्यांदा रेल्वेला फायदेशीर बनविले असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. तसेच जनविश्वास रॅलीदरम्यान मुख्य मंचावर उपस्थित सर्व नेत्यांनी एकमेकांचे हात धरून उभे राहून संपूर्ण देशाला विरोधी पक्षांच्या एकतेचा आणि ताकदीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.