इस्लामाबाद : पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे ज्येष्ठ नेते शेहबाज शरीफ पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. रविवार दि. ३ मार्च रोजी मतदानानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
शेहबाज शरीफ यांनी शनिवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. मतदानापूर्वीच आकडेवारी पीएमएल-एनच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर देशातील सत्ता पुन्हा एकदा शेहबाज शरीफ यांच्या हाती येईल, असे मानले जात होते. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय नेते उमर अयुब खान यांनी त्यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मतदानादरम्यान, शेहबाज यांनी सुरूवातीलाच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर १०० हून अधिक मतांची आघाडी घेतली. शेहबाज शरीफ यांना एकूण २०१ मते मिळाली, तर पीटीआयचे उमर अयुब खान यांना ९२ मते मिळाली.
यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यानंतर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांनी पक्षाच्या वतीने पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. शेहबाज शरीफ हे यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी पीपीपीसोबत सरकार स्थापन केले होते.