सोलापूर : सोलापूरच्या न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सह्या आणि बनावट आदेश तयार करून मुद्देमाल कक्षातील १६ लाख ६९ हजार ६७८ रूपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हडपली आणि न्याय व्यवस्थेची प्रतिमा कलंकित केल्याबद्दल संबंधित कारकुनाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
केदार हावळे (वय ५७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे. खटला २००८ सालातील असून त्याचा निकाल १६ वर्षांनी लागला आहे. केदार हावळे याने न्यायालयात कारकूनपदावर सेवेत असताना तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांच्या नावाने बनावट सह्या आणि बनावट आदेश तयार करून तसेच मुद्देमाल कक्षाची चावी चोरून न्यायालयाच्या मुद्देमाल कक्ष आणि स्ट्राँगरूममधील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली होती. जेलरोड पोलीस ठाणे, विजापूर नाका पोली ठाणे व मंद्रूप पोलीस ठाण्याशी संबंधित गुन्ह्यातील जप्त केलेला हा किंमती मुद्देमाल न्यायालयात जमा न करता त्याचा अपहार केला होता.
जुलै २००४ ते ३० आॕक्टोंबर २००७ या कालावधीत हा प्रकार घडला असता अखेर त्याचे बिंग फुटले. तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन २८ एप्रिल २००८ रोजी केदार हावळे याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.