वाराणसी : ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. मुस्लिम पक्षकारांनी याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली. यातच आता हिंदू पक्षाने ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजास्थानाला धोका निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
हिंदूू पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी याबाबत बोलताना मोठा दावा केला आहे. ज्ञानवापीतील व्यास तळघराच्या वरील बाजूस नमाज अदा करण्यास आलेल्या मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे स्लॅबवर भार येत आहे. त्यामुळे हा स्लॅब कोसळून त्या खाली असलेल्या पूजास्थानाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. व्यास तळघरातील पूजास्थानाचे संरक्षण व्हावे, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती विष्णू शंकर जैन यांनी दिली.
याचिकेत नेमके काय म्हटले?
जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत व्यास तळघराच्या वरील भागात मोठ्या प्रमाणावर जमण्यास मुस्लिम बांधवांना प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे. तसेच व्यास तळघरात दुरुस्तीचे काम करण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून पूजास्थान संरक्षित करता येईल. व्यास तळघरातील पूजास्थानाची दुरुस्ती न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय विनाअडथळा होऊ शकत नाही, असे वकील जैन यांनी म्हटले आहे.