मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, असा अनेकांचा कयास आहे. आता काही दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत. एका मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली होती. यावर भाजपा नेत्यांनी पलटवार केला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना जोरदार प्रत्युत्तर दिले.
काळी संपत्ती गोळा करणा-या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे.
ठाकरेंचा स्वत:ला मोठे दाखवण्याचा प्रयत्न
मला वाटते की, स्वत:ला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणे म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो असे सांगण्यासारखे आहे. नितीन गडकरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचे नाव नव्हते. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वांत आधी नितीन गडकरींचे नाव येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
घरगड्यांनी चिंता करू नये
भाजपाने अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत ठाकरे गट तसेच संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी यांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असा खोचक टोला भाजपाने लगावला.