पुणे : राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येणा-या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला. विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसामुळे सर्वांत जास्त नुकसान झाले. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानात बदल होत असून आता रात्री थंडी, दिवसा उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात पुढील २४ तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २१ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, जळगाव आणि मोहोळ येथे १४.९ अंश सेल्सिअसच्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
गुरुवार महिन्यातील सर्वात थंड दिवस
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी राजधानी म्हणजेच दिल्लीत थंडी होती, किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअस कमी आहे. पुढील काही दिवस दिल्ली आणि आसपासच्या शहरात अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे भारतीय हवामान विभागने म्हटले आहे. गुरुवार हा महिन्यातील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला.
हिमालयीन भागांत मार्चमध्येही थंडी कायम
हवामान विभागाचे म्हणणे आहे की, हिमालयीन भागात लवकरच पाऊस आणि बर्फवृष्टी पुन्हा पाहायला मिळेल. त्यामुळे मार्चमध्येही थंडी कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील ५ दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम हिमालयी प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील.