लातूर : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन येथील समाजसेवक शामराव सूर्यवंशी यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारा २०२१- २२ या वर्षीचा कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यतेविरुध्द सामाजिक चळवळ उभारली. भूमीहीन शेतमजूर व कामगारांसाठी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रह केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
तसेच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली. हे कार्य विचारात घेऊन, शासनाने मागील २२ वर्षांपासून दरवर्षी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड यांच्या नावाने एक व्यक्त्ती व एक संस्था यांना पुरस्कार देण्याचे जाहिर केले असून त्यानुषंगाने मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीने लातूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, गोर गरीब, भूमिहीन,दिन दलितांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे शामराव सूर्यवंशी यांना सन २०२१-२२ या वर्षांकरिता कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.