इंफाळ : मणिपूरच्या इंफाळमध्ये पोलिसांना दोन मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इंफाळच्या पूर्व आणि पश्चिम भागात हे मृतदेह सापडले आहेत. मृतांना हात बांधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वृत्तानुसार, ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तैरेनपोकपी परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, ज्याचे वय सुमारे ४० वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती, त्यांचे हात पाठीमागे बांधलेले होते आणि त्यांच्या डोक्यावर गोळ्यांच्या खुणा होत्या. स्थानिक लोकांनी मृतदेह पाहिला आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. ज्या महिलेचा मृतदेह सापडला ती ‘त्या’ चार जणांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे, ज्यांचे अपहरण करण्यात आले आहे.
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कांगचुप चिंगखॉंग गावाजवळ ७ नोव्हेंबर रोजी एका चेकपॉईंटवर मेईतेई लोकांच्या जमावाने एक वाहन थांबवले आणि त्यात प्रवास करणाऱ्या चार कुकी लोकांचे अपहरण केले. यातील तीन जण एका सैनिकाच्या कुटुंबातील आहेत. यामध्ये सैनिकाच्या आईचाही समावेश आहे. लोकांचे अपहरण झाल्याची बातमी पसरताच काही कुकी लोक हातात शस्त्रे घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कांगचूपच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोन पोलीस आणि एका महिलेसह नऊ जण जखमी झाले होते.