नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे ९ ते ११ मार्च रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर प्रयोग होत आहेत. काल पहिल्या दिवशी या शिवगर्जना महानाटयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. रविवारी दुस-या दिवशीच्या महानाट्याच्या प्रयोगाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे.आज ११ मार्चचा शेवटचा प्रयोग होणार आहे. हा प्रयोग सवार्साठी खुला असून प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. शिवगर्जना महानाट्यात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले.
यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, आर्ग्यावरुन सुटका, पुरदंरचा तह, शाईस्तेखानाची फजिती अशा अनेक घटनावर आधारित प्रसंग हुबेहुब सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या समोर ऐतिहासिक क्षण डोळ्यापुढे जशाच तसे उभे राहीले. तसेच या कार्यक्रमाच्या सुरवातीला एका कलावंताने संपूर्ण मैदानावर घोडयावर बसून रपेट मारुन सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवगर्जना महानाटयाला नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिकांनी गर्दी केली. जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती लावली होती. प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग उद्या सोमवारी शेवटचा प्रयोग होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.