अकोला : शेतक-यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करीत असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, गुरुवारी सकाळी शिवसैनिकांनी कौलखेड परिसरातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.
विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतक-यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याकडून देण्यात आला होता.
अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाले.
अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतक-यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १६४ कोटींची मदत मंजूर केली.
मात्र रबी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतक-यांना खरीप हंगामातील नुकसानीचा मदत मिळालेली नाही. या नुकसानभरपाईसह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि. प. गटनेते गोपाल दातकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासह विविध संस्था, संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.