23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रवसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

राज ठाकरे यांना मोठा धक्का

पुणे : लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र.. साहेब मला माफ करा’, असे म्हणत मनसेला रामराम करत असल्याचे वसंत मोरे यांनी ट्वीट करत सांगितले आहे. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

वसंत मोरे हे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाचे नेते आहेत. मनसेच्या मोजक्या नेत्यांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख व्हायचा. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत. मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही? याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

वसंत मोरे यांचे राजीनाम्याचे पत्र
प्रति, मा. श्री. राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
विषय : माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदा-या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिका-यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिका-यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
धन्यवाद..!
आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे

सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट
एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR