बंगळूरू : भाजपाचा दारुण पराभव करत काँग्रेसने मोठ्या बहुमतासह कर्नाटकमधील सत्ता मिळवली होती. मात्र राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदावरून सिद्धारामैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये सुरू असलेली रस्सीखेच सर्वज्ञात आहे. यादरम्यान, कर्नाटकमधील भाजपाचे युवा नेते तेजस्वी सूर्या यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमधील ही भेट राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. हल्लीच काँग्रेसच्या काही आमदारांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली होती. तसेच ते मुख्यमंत्री होणार असतील तर आपण पांिठबा देऊ असे सांगितले होते. मात्र तेव्हा शिवकुमार यांनी अशा प्रकारची कुठलीही शक्यता फेटाळून लावली होती.
कर्नाटमधील काँग्रेसचे राजकारण पाहिल्यास सिद्धारमैय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील राजकीय चढाओढ ही काही नवी बाब नाही आहे. हल्लीच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्यमंत्रिपद सोडणार का, असे विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना सिद्धारमैय्या यांनी मी पूर्ण पाच वर्षे सरकार चालवणार, असे सांगितले होते. सिद्धारमैय्या यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने सिद्धारमैय्या यांना पुढे करत निवडणूक लढवली होती. मात्र डी. के. शिवकुमार यांनाही पक्षाने तेवढेच महत्त्व दिले होते. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर जेव्हा शिवकुमार यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी आमच्यासाठी कर्नाटकमध्ये पक्ष मजबूत होणे, हेच मुख्य लक्ष्य आहे. पदाची महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीत फटका?
जेडीएसने हल्लीच सांगितले होते की, जर डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केली तर पक्ष त्यांना पाठिंबा देईल. या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. कर्नाटकमध्ये भाजपा आणि जेडीएसने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सत्तेत असल्याने आपल्याला लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो, याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. दरम्यान, भाजपा, जेडीएस आणि शिवकुमार यांच्यामध्ये काही समिकरणे जुळली तर त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.