अहमदपूर : प्रतिनिधी
वाशी नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयरेसंबंधी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. पुनश्च मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सत्ताधारÞी पक्षांनी केले आहे मात्र यावेळी गाठ आता मनोज जरांगे पाटलांशी आहे हे सरकारने लक्षात ठेवावें लवकरात लवकर सगेसोयरे संबंधित अध्यादेश लागू करावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा सामना या सरकारला करावा लागेल, असा गर्भित इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील हे अहमदपूर येथील जिजाऊ मंगल कार्यालय चामे गार्डन, थोडगा रोड येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की, सरकार जर मराठा समाजास मागास मानत असेल तर मागास प्रवर्गाच्या बाहेर संरक्षण का दिले आहे आणि ते ३० टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजास दहा टक्के आरक्षण हे कुठल्या धर्तीवर दिले आहे. मागील सरकारने अनुक्रमे १६ आणि १३ टक्के आरक्षण दिले होते. आता पुन्हा समाजाची संख्या वाढली असतानाही या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. अहमदपूर तालुक्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत. अशा ठिकाणी निजाम कालीन गॅजेटचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी केली. सगे-सोय-याचा अध्यादेश लागू करण्यासाठी शासनाने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते पण तेथे सगे सोयरे याबाबतीत कसलीही चर्चा केली नाही. यावरून मराठा समाजाच्या मागणी संदर्भात हे सरकार चक्क वेळकाढूपणा, असंवेदनशील, आणि चालढकल ,करीत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकरणे प्रलंबित असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा बांधवावर एसआयटी नेमण्याची घाई नेमकी का केली जाते असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला.यावेळी मुस्लिम व दलित समाज बांधव यांच्या वतीने जरांगे पाटील यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक जयराम पवार हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दयानंद पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन अॅड.आनंद जाधव ,मारुती बुद्रुक पाटील ,गजानन गुरनाळे यांनी केले