24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेच्या रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार

लोकसभेच्या रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार

रक्षा खडसेंनी स्वीकारले आव्हान

जळगाव : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान भाजप खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.

त्यांच्या विरोधात स्वत: एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यामुळे बारामतीप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघातील लढत परिवारात होणार आहे. सासरे विरुद्ध सून किंवा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे. त्यावर भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या रणांगणात नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

नाराजी नाही, सर्वच एकत्र
आपल्या उमेदवारीनंतर मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही जणांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे? या प्रश्नावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, मतदारसंघात कुठलीही नाराजी नाही. सर्वांनी मला एक विश्वास दिला आहे. निवडणुकीत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून देऊ. स्व. हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा विश्वास दिला आहे.

समोर कोणीही असले तरी पूर्ण तयारी
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, आता समोर सासरे असोत की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार आहोत. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR