नाशिक : सध्या सर्वत्र ‘मोदी की गॅरंटी’ असे कॅम्पेन चालवले जात आहे. जाहिरातींमध्येही याचा प्रचार केला जात आहे. पण भाजपच्या गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे. चले तो चाँद तक, नहीं तो शाम तक.. असा हा प्रकार आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दाखल झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. तेव्हा जयंत पाटील बोलत होते.
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वांत अस्वस्थ जर कोणी असेल तर तो शेतकरी आहे. यापूर्वी देखील देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला होता. त्यावेळी ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले. पण दिल्लीचे सरकार हलले नाही. आता पुन्हा एकदा आमचा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको पण आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या, असे आवाहन जयंत पाटलांनी शेतक-यांच्या वतीने सरकारला केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्यांनी भारतभर पदयात्रा काढली, आता न्याय यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र टीव्हीवर, मोबाईलवर ते कुठेच दिसणार नाहीत. कारण तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचे याचा निकाल झालेला आहे. जे सोयीचे आहे तेच तुमच्या डोळ्यांना दिसते. त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरांत बेकारी, महागाई आहे, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतक-यांनी जागरूक झाले पाहिजे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.