इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. जर पुन्हा असे केले तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथे सुप्रिया सुळेंनी सभा घेतली. त्या सभेतून त्यांनी अजित पवार गटावर जोरदार घणाघात केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो. माझ्या समोर बसलेली जनता उतरवेल, मला काहीही करायची गरज नाही. दमदाटी बंद करायची आहे. कुणीही आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचे आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल असेही त्यांनी बजावले. तसेच भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे?, एका मित्रपक्षाचा नेता दुस-या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो. हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावे लागले असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावला.
काय आहे प्रकरण?
खालच्या पातळीवरील एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपणास तालुक्यात फिरु देणार नाही, अशी धमकी देणा-या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी नुकतेच भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला.