अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलीत अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे. आता नवनीत राणा यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, त्यावर कोणीही शंका घेऊ नये, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
तर भाजप प्रवेशावर योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील. जो काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील, त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.