28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे-चव्हाण यांच्यात चर्चा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे-चव्हाण यांच्यात चर्चा

जालना : भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली. जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तर सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून भेटायला आल्याने अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले.

या भेटीविषयी माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो. त्यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे. ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही. जरांगे पाटील यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्त आहेत त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे, आणि ही माझी भूमिका आहे, असे ते म्हणाले.

आमची फसवणूक : जरांगे
अशोक चव्हाण समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का? असे मी आधी विचारले. सग्या सोय-याची अंमलबजावणी करु म्हणाले होते ती आजपर्यंत का केली नाही? गुन्हे परत घेण्याऐवजी जास्त गुन्हे वाढत आहेत. हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते ते का घेतले नाही? ते समाज म्हणून करत असतील तर आम्ही अशोक चव्हाण यांना दोष देणार नाहीत. आमची फसवणूक झाली आहे हे आम्ही त्यांना ठासून सांगितले आहे. जाणून बुजून गृहमंत्री खोटे केसेस दाखल करायला लावत आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

२४ मार्चला बैठक
आम्ही २४ तारखेला महाराष्ट्राची बैठक लावली आहे. पुढची दिशा काय ठरवायची यासाठी महाराष्ट्रातील साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक, ज्यांनी सभांचे आयोजन केले होते ते सारे आयोजक आणि मराठा समाज यांची बैठक घेणार आहोत. २४ मार्चला सकाळी १० वाजता अंतरवालीमध्ये आता निर्णायक बैठक होणार आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. २४ मार्चला निर्णायक भूमिका ठरवणार आणि तुकडा पाडणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR