नागपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात कडक उन्हाची हवी तशी तीव्रता अद्याप जाणवू लागलेली नसली तरी कांजण्याची साथ मात्र वाढली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दररोज १० ते १२ कांजण्याचे रुग्ण दाखल होत असून, मेडिकलमध्येही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लहान मुले आणि तरुणांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हा आजार ‘व्हॅरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूमुळे होतो. प्रौढांमध्ये या आजाराला ‘नागिन’ असेही म्हणतात. हा विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर सुमारे दोन आठवड्यानंतर लक्षणे दिसतात असे गावंडे यांनी सांगितले. सहसा, संसर्ग पाठीला आणि पोटाला होतो. परंतु, काहीवेळा उन्हाची तीव्रता जास्त असल्यास हा रोग चेह-याया आसपाससह नाक आणि कानांमध्ये देखील होतो. हा आजार गर्भवती, एचआयव्ही बाधित, गंभीर मधुमेही असलेल्यांसाठी धोकादायक असू शकतो, असे ते म्हणाले.
श्वास घेण्यात अडचण येणे, डोकेदुखी किंवा काहीवेळा स्मरणशक्ती कमी होणे देखील होते. साधारणत: उन्हाळ्यात हा आजार जास्त दिसून येतो मात्र यावेळी आतापासूनच रुग्ण आढळून येत आहेत.